
मोठी बातमी : डॉ.महेश्वर रेड्डी यांची पुणे सीआयडीत बदली! ; धुळ्याचे श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक
राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; गृह विभागाने जारी केले बदल्यांचे आदेश
जळगाव I प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज (२० एप्रिल) राज्याच्या पोलीस प्रशासनात व्यापक फेरबदल केले आहेत. या आदेशानुसार जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांची बदली पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. निवडणुकीच्या धावपळीनंतर आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वाच्या नियुक्ती
राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगलीत, तर पुण्याचे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आता मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) जबाबदारी सांभाळतील.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीसह गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पुण्याचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगावमध्ये अवैध शस्त्रे, गुन्हेगारी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता धुळे येथील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीकांत धिवरे जळगावचा पदभार स्वीकारणार असल्याने, गुन्हेगारी नियंत्रणासाठी ते कोणती पावले उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता असून, नवनियुक्त अधिकारी येत्या काही दिवसांत आपला पदभार स्वीकारतील.




