
तुमचा शनि काढून देतो’ म्हणत वृद्धाची फसवणूक; अंगठी व रोख रक्कम लंपास
नवीन बसस्थानक परिसरात भरदिवसा प्रकार; दोन भोंदूंविरुद्ध गुन्हा
जळगाव : प्रतिनिधी “तुमचा शनि काढून देतो” असे सांगत हातचलाखीने एका वृद्धाची सोन्याची अंगठी व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शहरातील नवीन बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी दोन अज्ञात भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी) हे आपल्या मुलीकडे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी संवाद साधत शेगावच्या बसची चौकशी केली. यानंतर त्याने एका साथीदाराकडून दगड आणून सर्जेराव यांच्या हातात दिला आणि “राम-राम” म्हणण्यास सांगितले.
हातचलाखीने त्या दगडाचे रुद्राक्षात रूपांतर केल्याचा भास निर्माण करून भोंदूंनी वृद्धाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांनी सर्जेराव यांना बाजूला नेऊन त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील ९०० रुपये काढून घेण्यास सांगितले आणि ती रक्कम साथीदाराकडे देण्यास भाग पाडले.
यानंतर काही अंतर पुढे चालण्यास सांगून दोघेही आरोपी तेथून पसार झाले. काही वेळाने मागे वळून पाहिले असता दोघेही दिसेनासे झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सर्जेराव यांच्या लक्षात आले.
या घटनेप्रकरणी २१ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करत आहेत.
दरम्यान, अशा भोंदू व जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या व्यक्तींंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.





