खान्देशजळगांवशासकीयशिक्षण

नाशिराबादमधील उर्दू शाळेत इयत्ता आठवी वर्ग सुरु करा

नाशिराबादमधील उर्दू शाळेत इयत्ता आठवी वर्ग सुरु करा

जळगाव जिल्हा एकता संघटनेची सीईओंकडे निवेदनाद्वारे मागणी

जळगाव : नाशिराबाद येथील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न समोर आला असून, जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळांमध्ये २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तातडीने आठवी इयत्ता सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर (आयएएस) यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनातून नाशिराबाद येथील केएसटी उर्दू माध्यमिक शाळेतील प्रशासकीय अनागोंदी, शिक्षकांची तीव्र कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद दीर्घकाळापासून रिक्त असून मंजूर दहा शिक्षकांच्या तुलनेत केवळ तीन शिक्षकांवर सुमारे ४५० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असून २०२६ चा एसएससी निकालही अत्यंत खराब लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, एका अमान्य व्यक्तीकडून विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवर आणि प्रवेशपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

संघटनेने म्हटले आहे की, यावर्षी नाशिराबादमधील जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळांमधून २२९ विद्यार्थी उत्तीर्ण होत असून त्यांच्यासाठी सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह माध्यमिक शिक्षणाची कोणतीही सक्षम व्यवस्था उपलब्ध नाही. शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत मोफत व दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असल्याची आठवणही निवेदनात करून देण्यात आली आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चौहान यांना तातडीने बोलावून आवश्यक सूचना दिल्याचे सांगण्यात आले. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या सहा उर्दू प्राथमिक शाळांपैकी किमान तीन शाळांमध्ये तातडीने आठवीचा वर्ग सुरू करण्याची तसेच नैसर्गिक वाढीनुसार नववी, दहावी आणि उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button