
पोलीस दलात मोठे फेरबदल;नाशिक परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे तसेच नवीन पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशात मुंबई, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमधील पोलीस उप आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.आयपीएस प्रवीण मुंढे आणि मोक्षदा पाटील यांना पदोन्नती देऊन त्यांची बृहन्मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक पदी अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली असून, येथील विद्यमान अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची बदली बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये फोर्स वनचे पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS मुंबई) येथे बदली झाली आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून विजय खरात यांची वर्णी लागली असून, विशाल गायकवाड यांची पुणे लोहमार्ग अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) उज्ज्वला वानकर, रमेश चोपडे आणि वैशाली शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच, पुण्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये नियुक्ती झाली आहे.
या आदेशात काही अधिकाऱ्यांना मुदतवाढही देण्यात आली असून, ठाण्याचे उपायुक्त सचिन गोरे आणि नागपूरचे उपायुक्त राहुल मदने यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासकीय निकड आणि पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार हे फेरबदल करण्यात आल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.





