
छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुल दुरुस्तीला अखेर सुरुवात; २४ तास वाहतूक बंद
जळगाव शहरातील पुलावरील तांत्रिक दोषांवर प्रशासनाची दखल; सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
जळगाव प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक त्रुटी, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निर्माण झालेली कंपने व देखभालीअभावी सैल झालेल्या खटक्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहनांची सततची ये-जा करताना होणारा प्रचंड आवाज, तसेच संभाव्य अपघाताचा वाढता धोका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार प्रशिक्षक दीपककुमार पी. गुप्ता यांनी मागील चार महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करत संबंधित विभागांकडे तक्रारी दाखल केल्या, पत्रव्यवहार केला तसेच नाशिक सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागापर्यंत हा विषय पोहोचवून तातडीने दुरुस्तीची मागणी लावून धरली होती.
अखेर या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रशासनाने पुलावरील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १६ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून रविवार दि. १७ मे रात्री १२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर अखेर तोडगा निघाल्याची भावना व्यक्त केली आहे.
या संपूर्ण घडामोडीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाची घेतलेली तातडीची दखल यामुळे लोकहिताच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.





