
अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरातून तब्बल २.९४ कोटींची संपत्ती जप्त
१० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर एसीबीची कारवाई; रोख रक्कम, सोने, प्रॉपर्टीची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश
जळगाव | प्रतिनिधी
अकोला येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील विष्णुनगर येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकून तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
किरण चौधरी (वय ५७) यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये २६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीचे राहते घर जळगाव येथील विष्णुनगर परिसरातील साईप्रभा आर्केडमध्ये असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १८६ अन्वये जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला घरझडतीचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, घरझडतीसाठी अधिकारी पोहोचले असता संबंधित घर बंद असल्याने पंचांसमक्ष ते सीलबंद करण्यात आले होते. मात्र, २८ जून रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास आरोपीच्या नातेवाईकांनी घराच्या मागील गॅलरीचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी एसीबीचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी संबंधितांना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर २ जुलै रोजी आरोपीची पत्नी मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत, दोन शासकीय पंच, गोल्ड व्हॅल्युअर, बँक कॅशियर आणि डॉक्टर यांच्या समक्ष घरझडती घेण्यात आली. या कारवाईत घरातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३१ हजार ४१६ रुपये किमतीचे १५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या तसेच ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या घरातील मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या.
एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.





