
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा गौरव; विकास, विश्वास आणि जनकल्याणाचा प्रवास अधोरेखित
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची पत्रकार परिषद; विविध योजनांच्या यशाचा घेतला आढावा
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या माध्यमातून देशाला नव्या उंचीवर नेले असून, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने हा उल्लेखनीय प्रवास ठरल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.
भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर व विजय वानखेडे उपस्थित होते.
रक्षाताई खडसे म्हणाल्या की, २०१४ पासून देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर सातत्याने विश्वास दाखविला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राद्वारे सरकारने सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचे काम केले. जनधन योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे.
शेतकरी कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड योजना आणि सिंचन प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी, सुकन्या समृद्धी आणि उज्ज्वला योजनेचा उल्लेख करत महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीचाही त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारित जाळे, वंदे भारत एक्सप्रेस, मेट्रो प्रकल्प, नवीन विमानतळ, अटल टनेल, चिनाब पूल आणि भारतनेटसारख्या प्रकल्पांमुळे देशाच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख करत कर्तव्य पथ, पंचतीर्थ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला.
जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा अधिक भक्कम झाली असून, जी-२० अध्यक्षपद, वाढलेली परकीय गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि ‘वसुधैव कुटुंबकम’च्या भावनेतून जगाला दिलेला संदेश यामुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा उंचावल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या विकासासाठी मोदी सरकारची १२ वर्षांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली असून, जनतेचा विश्वास हेच सरकारचे सर्वात मोठे बळ असल्याचे रक्षाताई खडसे यांनी यावेळी अधोरेखित केले.





