खान्देशगुन्हेजळगांव

विमानतळ परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त; शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

विमानतळ परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त; शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना गोपनीय माहितीदारामार्फत जळगाव विमानतळासमोरील कुसुंबा परिसरातून धानवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.

पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव गणेश श्रावण सोनवणे (वय २४, व्यवसाय मजुरी, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीदरम्यान जीन्स पँटच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा आढळून आला.

पोलिसांनी पंचांसमक्ष सदर गावठी पिस्तूल जप्त केले असून आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. रामकृष्ण पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button