
पाचोरा येथे कुटुंबाला बंधक बनविल्याचा महिलेचा आरोप; पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न
जळगाव | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील पाहण गावात आपल्या पतीसह वृद्ध सासू-सासरे आणि नातेवाईकांना काही ग्रामस्थांनी बंधक बनवून ठेवल्याचा गंभीर आरोप मानसी यश ठक्कर यांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलिसांनाही गावकऱ्यांनी रोखून धरल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
बजाज फायनान्स कार्यालयाबाहेर पतीला मारहाण केल्याचा आरोप
मानसी ठक्कर यांच्या तक्रारीनुसार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचे पती यश योगेश ठक्कर व त्यांचे मित्र झेनू आबादी हे पाचोरा येथील बजाज फायनान्स कार्यालयात गेले होते. त्यावेळी भिकन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, छोटू पाटील यांच्यासह ५० ते ७० जणांनी त्यांना कार्यालयाबाहेर मारहाण केल्याचा आरोप आहे.
यानंतर यश ठक्कर यांना जबरदस्तीने वाहनातून पाहण गावाकडे नेण्यात आले आणि त्यांच्या मोबाईलवरून मानसी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप
पती बेपत्ता असल्याने मानसी ठक्कर या आपल्या लहान मुलीसह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या. मात्र, PSI गोपाल देशमुख यांनी हा प्रकार गुन्हा नसल्याचे सांगत तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आपण बराच वेळ विनंती करूनही तक्रार घेतली गेली नाही. वरिष्ठांकडून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यास मनाई असल्याचेही पोलिसांनी सांगितल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
दरम्यान, त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितल्यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली. त्यानंतर पाचोरा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि यश ठक्कर यांना पाहण गावातील काही लोकांनी बंधक बनवून ठेवल्याची माहिती समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मंदिरात डांबून मारहाण
पाचोरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता यश ठक्कर यांना मंदिरात ठेवण्यात आल्याचे आणि त्यांना मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. पोलिसांनी अडचणींचा सामना करत त्यांची सुटका करून त्यांना पाचोरा पोलीस ठाण्यात आणल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
मात्र, त्यानंतर मानसी यांच्या वृद्ध सासू-सासरे व नातेवाईकांसह पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही संबंधित व्यक्तींनी बंधक बनवून ठेवल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यक्तींना सोडण्यासाठी त्यांच्या स्त्रीधनाची मागणी करण्यात येत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवून घेण्याची पुन्हा विनंती करूनही जिल्हापेठ पोलिसांनी हा प्रकार त्यांच्या हद्दीत नसल्याचे सांगून पाचोरा येथे जाण्यास सांगितल्याचा आरोप मानसी ठक्कर यांनी केला आहे. पती, कुटुंबीय आणि पोलिसांनाच बंधक बनविण्याचा आरोप होत असताना हा प्रकार गुन्हा नसल्याचे सांगितल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले.
पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडेही या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी पोलिस अधीक्षक निघून गेल्याने आपली तक्रार तत्काळ नोंदवून घेण्यात आली नसल्याचा आरोप मानसी ठक्कर यांनी केला आहे.
आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झाल्यास किंवा पाचोरा ते जळगाव प्रवासादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित आरोपींसोबतच पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीतील आरोपांची अधिकृत पोलिस चौकशी व सत्यता तपासल्यानंतरच पुढील बाबी स्पष्ट होतील.





