खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळात मंदिराच्या पूजाऱ्याची निर्घृण हत्या

भुसावळात मंदिराच्या पूजाऱ्याची निर्घृण हत्या

खुनामागील कारण अद्याप गूढ, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल

भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरालगत झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिराच्या पूजाऱ्याची डोक्यात टणक वस्तूने प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृत पूजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय ५५, झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. ते आरपीडी रस्त्यालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये पूजारी म्हणून कार्यरत होते.

सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिरात गेल्यानंतर संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. डोक्यावर टणक वस्तूने प्रहार केल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना कळविले.

माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार संदीप पालवे आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला.

दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरी, वैयक्तिक वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून हा खून झाला, याचा तपास सुरू असून जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button