खान्देशगुन्हेजळगांव

‘काल चार बळींचे निवेदन दिले; आज पाचवा बळी गेला!’

‘काल चार बळींचे निवेदन दिले; आज पाचवा बळी गेला!’

बायपास बंद झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांवरून नगरसेवक अरविंद देशमुख आक्रमक; NHAIकडे ४८ तासांत उपाययोजनांची मागणी

जळगाव | प्रतिनिधी : पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक वाढली असून, अपघातांच्या मालिकेवरून आता प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. ‘काल चार बळींचे निवेदन दिले, आज पाचवा बळी गेला’ असा सवाल उपस्थित करत जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) पुरवणी निवेदनाद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

देशमुख यांनी २४ ऑगस्ट रोजी ई-मेलद्वारे निवेदन देऊन महामार्गावरील धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आणखी बळी जाऊ नये, यासाठी तातडीने रोड सेफ्टी ऑडिट आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच आणखी एका नागरिकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी पुरवणी निवेदनात केला आहे.

‘पाच मृत्यू म्हणजे पाच आकडे नाहीत’

‘पाच मृत्यू म्हणजे पाच आकडे नाहीत; पाच कुटुंबांनी आपली माणसे कायमची गमावली आहेत,’ अशी भावनिक भूमिका देशमुख यांनी मांडली आहे. अपघातानंतर पंचनामा, उपचार आणि मृत्यूची नोंद करण्यापलीकडे जाऊन अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष पथक पाठविण्याची मागणी

NHAIच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचे विशेष पथक तातडीने जळगावात पाठवून प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे स्वतंत्र Road Safety Audit करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

खड्डे, साईडपट्ट्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करा

महामार्गावरील खड्डे, खचलेल्या व असमतोल साईडपट्ट्या, धोकादायक उंचवटे यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी. बायपास पूर्ण क्षमतेने सुरक्षितपणे सुरू होईपर्यंत शहरातील महामार्गावर २४ तास रोड सेफ्टी व आपत्कालीन देखभाल पथक तैनात करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

वेग नियंत्रणासह सुरक्षा उपाययोजनांची मागणी

पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक, स्पीड लिमिट बोर्ड, रम्बल स्ट्रिप्स आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

बायपासच्या कामाचीही चौकशी करा

पाळधी–तरसोद बायपासवरील पुलाचा भराव खचणे तसेच बायपास बंद केल्यानंतर पर्यायी मार्गावर पुरेशा पूर्वसुरक्षा उपाययोजना न केल्याच्या मुद्द्यांची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

‘आता सहाव्या बळीची वाट पाहणार आहात का?’

‘काल मी लिहिले होते—पाचव्या बळीची वाट पाहू नका. दुर्दैवाने आज पाचवा बळीही गेला. आता सहाव्या बळीची वाट पाहणार आहात का?’ असा थेट सवाल देशमुख यांनी प्रशासनाला केला आहे.

निवेदनाची तातडीने दखल घेऊन ४८ तासांच्या आत प्रत्यक्ष उपाययोजना सुरू कराव्यात आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापुढेही दुर्घटना घडल्यास याबाबत केंद्र शासन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच संबंधित सक्षम यंत्रणांकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘जळगावकरांचा जीव स्वस्त नाही. पाच बळी पुरे झाले; आता आणखी एकही बळी नको,’ असे अरविंद देशमुख यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button