
अल्पवयीन मुलीचा बालविवाह; अत्याचारप्रकरणी चौघे अटकेत
एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील घटना; कासोदा पोलिसांची कारवाई
एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, १६ वर्षीय पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह कमलाकर रमेश भिल याच्यासोबत लावून देण्यात आला. विवाहानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी तिने एका नवजात बालकाला जन्म दिला.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर कासोदा पोलिसांनी कारवाई करत भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यात दिलीप देवचंद गोकुळ, कमलाकर रमेश भिल, रमेश कौतिक भिल आणि नबाबाई भिल यांना आरोपी करण्यात आले आहे. चौघांना २० ऑगस्ट रोजी पहाटे अटक करण्यात आली.
प्रकरणाचा तपास कासोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





