

तुरीच्या शेतात ‘गांजा’ पिकवला; पोलिसांचा छापा, १७५ झाडे जप्त
देवझिरी शिवारात कारवाई; मध्य प्रदेश सीमेलगत शेती करणारा ताब्यात
जळगाव : तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड करून त्याची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अडावद पोलिसांनी उघडकीस आणला आहे. देवझिरी गावाजवळील शेतशिवारात पोलिसांनी कारवाई करून गांजाची १७५ झाडे जप्त केली. या प्रकरणी देवसिंह बरेला याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने देवझिरी शिवारात कारवाई केली. तुरीच्या पिकामध्ये इतर पिकांमध्ये लपवून गांजाची झाडे वाढवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांची अचानक धडक
गांजाची झाडे आढळून आल्यानंतर पोलिसांनी ती ताब्यात घेतली. घटनास्थळावरून एकूण १७५ झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाचे वजन व किंमत निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
देवझिरी परिसर मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गांजाची लागवड नेमकी किती क्षेत्रात करण्यात आली होती आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.




