खान्देशजळगांवधार्मिक

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्ही, दामिनी पथकासह विशेष पथके तैनात

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्ही, दामिनी पथकासह विशेष पथके तैनात

मिरवणुकीवर दोन ड्रोनद्वारे नजर; मंडळांना क्रमांक देऊन चौकातील स्क्रीनवर विसर्जनाचा क्रम दर्शविणार

जळगाव | प्रतिनिधी

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीवर दोन ड्रोनद्वारे सतत देखरेख ठेवण्यात येणार असून, टॉवर चौक ते नेहरू चौक या मार्गावर विविध ठिकाणी बॅरिकेडिंग आणि PA Systemची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक तसेच गणेश मंडळांना आवश्यक सूचना तातडीने देता याव्यात, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना क्रमांक देण्यात येणार आहेत. संबंधित मंडळाला मिरवणुकीत सोडण्याचा क्रम कोर्ट चौकातील मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाला आपला क्रम स्पष्टपणे समजण्यास मदत होणार असून, मिरवणुकीत शिस्त राखण्यासही हातभार लागणार आहे.

गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या प्रत्येक ट्रॅक्टर चालकाची Breath Analyserद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. चालकाने मद्यप्राशन केलेले नसल्याची खात्री केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. महिलांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष Chain Snatching Squad तसेच महिला दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे.

संशयास्पद वस्तू किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बीडीडीएस पथकाकडून मिरवणूक मार्गाची रोड चेकिंग करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून सोशल मीडिया पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यात येत आहे. अफवा, आक्षेपार्ह मजकूर किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

बंदोबस्तासाठी एसआरपीएफ कंपनी, होमगार्ड आणि आरसीपीचा योग्य पद्धतीने वापर करण्यात येणार आहे. पोलिस दलातील डीएसबी, एलसीबी, कंट्रोल, वेलफेअर, सायबर आणि रीडर ब्रांच यांसारख्या नॉन-एक्झिक्युटिव्ह शाखांनाही स्ट्राइकिंग फोर्स म्हणून बंदोबस्तात सहभागी करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गुड मॉर्निंग स्क्वाडकडून धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या पुतळ्यांची सातत्याने तपासणी केली जात आहे. तसेच सेवाभावी संस्था आणि निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचीही बंदोबस्तासाठी मदत घेतली जाणार आहे.

मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना घटनास्थळीच फूड पॅकेटचे वितरण करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गणराया पुरस्कार’ ठेवण्यात आले असून, शिस्तबद्ध आणि सुरक्षित मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने केलेल्या या व्यापक नियोजनामुळे विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button