खान्देशजळगांवसामाजिक

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणविरोधी मोर्चामुळे जळगावातील वाहतुकीत तात्पुरते बदल

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणविरोधी मोर्चामुळे जळगावातील वाहतुकीत तात्पुरते बदल

४ ऑक्टोबरला दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक मार्गावर वाहतूक वळविणार

जळगाव, प्रतिनिधी : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जळगाव शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

मोर्चासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार चंद्रकांत हंडोरे, दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार आदी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बंदोबस्ताचा आढावा घेतला. मोर्चाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल राहणार आहे.

आकाशवाणी चौकाकडून न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने आणि एस.टी. बसेस आकाशवाणी चौक–कवयित्री बहिणाबाई उद्यान–रिंगरोड–गोकुळ स्वीटमार्ट–शाहू कॉम्प्लेक्स या मार्गाने वळविण्यात येतील.

न्यायालय चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने आणि एस.टी. बसेस न्यायालय चौक–शाहू कॉम्प्लेक्स–गोकुळ स्वीटमार्ट–रिंगरोड–कवयित्री बहिणाबाई उद्यान–आकाशवाणी चौक या मार्गाचा वापर करतील.

नेरी नाक्याकडून स्वतंत्र चौकाकडे येणारी वाहने नेरी नाका–पांडे चौक–सिव्हिल हॉस्पिटल–बेंडाळे चौक–चित्रा चौक–न्यायालय चौक या मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

प्रभात चौकाकडून नेरी नाका किंवा न्यायालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी प्रभात चौक–कवयित्री बहिणाबाई उद्यान–रिंगरोड–गोकुळ स्वीटमार्ट–शाहू कॉम्प्लेक्स–न्यायालय चौक–चित्रा चौक–बेंडाळे चौक–नेरी नाका हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

मोर्चाच्या कालावधीत नागरिक व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर अनावश्यकपणे वाहने आणू नयेत तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव पोलीस प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button