जळगांवराजकीय

मावळत्या महापौर जयश्री महाजन यांनी मांडला अडीच वर्षांचा लेखाजोखा, वाचा अडीच मिनिटात..

खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव शहर मनपात मोठ्या राजकीय घडामोडी घडवून शहराच्या महापौर पदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौर म्हणून कुलभूषण पाटील हे विराजमान झाले होते. विद्यमान महापौर, उपमहापौर आणि संपूर्ण कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानतर आज त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा मनपात मांडला. प्रसंगी मावळते विरोधी पक्षनेते सुनील महाजन, रियाज बागवान, किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मावळत्या महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, सर्वप्रथम मला शहराची प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शहरातील जनतेचे आभार व्यक्त करते. यासोबतच त्या वेळी सत्तांतर होतांना ज्या नगरसेवकांनी मला मतदान केले त्या सर्व सहकाऱ्यांचेही मी आभार व्यक्त करते. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब, खासदार विनायकजी राऊत साहेब, संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब, माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री व एकत्रित शिवसेनेचे तत्कालिन नेते नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथरावजी खडसे साहेब आमचे मार्गदर्शक नितीनभाऊ लढ्ढा या सर्व नेतेमंडळीनी मला आशीर्वाद दिला. माझ्यावर विश्वास दर्शविला, त्यांच्या ऋणातच मी राहू इच्छिते.

गेल्या अडीच वर्षांच्या काळात अनेक चांगली कामे करण्याचा, धाडसी निर्णय घेण्याचा, शहराचा सर्वागीण विकास करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मात्र अद्यापही अनेक कामे बाकी आहेत. विकासाचा अनुशेष भरून काढणे इतक्या लवकर शक्य नाही. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अर्धाकृती पुतळ्या ऐवजी पूर्णाकृती पुतळा बसवून नुकतेच त्याचे अनावरण करण्यात आले.

शहरातील पिंप्राळा या उपनगरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला गेला. लगेच तो अमलात आणून नुकतेच त्या पुतळ्याचेही अनावरण थाटात संपन्न झाले आहे. जी कामे केलीत ती पुरेशी नाहीत, याची मला नम्र जाणीव आहे. तरी काही चांगले ठराव गेल्या कालावधीत महासभेतून पारीत करून घेतले आहेत. यात प्रामुख्याने..

1) जळगाव शहरात असलेल्या तीनशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या रहिवाशी मालमत्तांची घरपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. याशिवाय महिलांच्या नांवे असलेल्या मालमत्तांच्या घटपट्टीत 5% सवलतीचा निर्णय यापुर्वीच घेतला गेला होता त्याची अंमलबजावणीही होत आहे. 2) शहरात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यथोचित स्मारक व्हावे म्हणून पिंप्राळाशिवारातील 10 एकर जागेवर नागपूरच्या दिक्षाभूमीची प्रतिकृती साकारणार आहे. त्यासंबंधीचा ठराव नुकताच महासभेत पारीत करण्यात आला.

3) शहरातील गरजू जनतेला हक्काचे घर मिळावे यासाठी सिडकोने प्रकल्प उभारावे यासाठी राज्य शासनाला विनंती करणारा ठराव पारित करण्यात आला. या ठराव राज्यशासनाने सकारात्मक निर्णय घेतला तर, अनेकांच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. 4) महासभेत पालिकेची अग्निशमन सेवा अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

5) शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या साफसफाईसाठी 2 नवीन नाले एस्केव्हेटर, स्विपिंग मशीन या वाहनाचा खरेदीचा कार्यादेश देण्यात आला आहे, लवकरच ती शहरात उपलब्ध होतील. 6) शहराचा वाढता विस्तार दिवसेंदिवस मनपातील कमी होत असलेले कर्मचारी तसेच प्रशासन गतिमान व्हावे यासाठी मनपात सुधारित आकृतिबंध तयार करून महासभेची मान्यता घेऊन राज्यशासनास प्रस्ताव पाठवून त्याला मान्यता मिळविली.

7) लवकरच सुधारित सेवाप्रवेश नियमावलीसही राज्यशासन मान्यता देईल. व भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल. 8) मोहाडी रस्त्यावरील लांडोरखोरी उद्यानास वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव महासभेतून पारीत करून घेतला.

9) शहरातील तरुण वर्गाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने शहरातील कर्तृत्ववान लोकांना जळगाव रत्न ” पुरस्कार देण्याचा निर्णय पूर्वी आपल्या पालिकेने घेतला होता. मात्र पहिल्या पुरस्कारानंतर यात शिथीलता आली होती. ती दूर करुन शहरातील ज्येष्ठ समाजसेवक स्व. डॉ. अविनाशदादा आचार्य व हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी आयुष्यभर काम करणारे स्व. अब्दुल गफ्फार मलिक यांना मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला गेला. व त्याची अंमलबजावणी करून तो प्रदान करण्यात आला. यासोबतच जगप्रसिद्ध विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्वलजी निकम आणि जळगाव शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाची भर घालणाऱ्या के. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदुदादा बेंडाळे यांनाही जळगाव रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

10) शहरातील मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला मनपा फंडातून 2000 रुपये प्रतिवर्ष सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 11) केंद्रशासनाची महत्वाकांक्षी अमृत योजना 2 ला मान्यता दिली गेली. याअंतर्गत मेहरूण तलावाचा स्रोत असलेल्या तलाव क्षेत्राचे पुर्नजीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

12) शहरातील रामदास कॉलनी व त्या सारख्या अनेक ओपन स्पेसवर सामाजिक संस्था व व्यावसायिक प्रतिष्ठाने यांच्या सहाय्याने बगिचे विकसीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ती विकसित केली 13) जळगाव शहरात विविध ठिकाणी लोकसहभागातून स्त्री व पुरुषांसाठी अत्याधुनिक प्रसाधन गृहे उभारण्यात आली.

14) दिव्यांग व्यक्तीच्या रेशनपोटी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ केली. 15) मोहाडी शिवारातील गट क्रमांक 60 मध्ये अत्याधुनिक क्रिडा संकुल विकसीत करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळेल.

16) जळगाव शहरातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडासंकुलासाठी महासभेत ठराव पारित करण्यात आलेला होता. यासाठी तत्कालीन क्रीडा मंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री मा. गिरीशजी महाजन यांच्या पाठपुरावामुळे २४० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. 17) जळगाव मनपा इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली.

18) शहरात दिवंगत कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 19) मनपा इमारतीतील वीज बचतीसाठी गोलाणी मार्केटच्या छतावर सोलर एनर्जी प्लान्ट बसविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे पालिकेच्या लाखो रुपयांच्या खर्चाची बचत होणार असून हा निधी विकासकामांसाठी वापरता येणार आहे.

20) शहराचा विस्तार वाढलेला आहे. एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता येणे शक्य व्हावे यासाठी पालिकेची शहर बस सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. 21) विद्यार्थासाठी मनपाच्या सानेगुरुजी ग्रंथालयाच्या इमारतीत अत्याधुनिक डिजिटल लायब्ररी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरु करण्याचा व इमारतीच्या नुतनिकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करून मा. आ. सत्यजितजी तांबे यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला. मी त्यांचेही आभार मानते.

पायाभूत सुविधांव्यतिरिक्त घेतलेले हे काही प्रमुख निर्णय आहेत. मात्र अद्यापही अनेक क्षेत्रात काम करणे शक्य आहे. पायाभूत सुविधांमध्येही अनेक कामे गेल्या अडीच वर्षात करण्यात आली. या कामाच्या बाबतीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर मात करून विरोधकांचेही सहकार्य घेवून कामांना मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने आरसीसी गटार, स्लॅब व कल्व्हर्ट रस्तांचे काँक्रीटीकरण, रस्तांचे डांबरीकरण, हायमास्ट, नवीन पोल, संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक, पूल बांधणे, बगीचा विकास, ओपनजिम यांचा समावेश आहे.

१) जळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच माझ्या काळात मी महापौर सेवा केंद्राची स्थापना केली व जनतेच्या समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. २) माझ्या कारकिर्दीत सर्वात जास्त मनपा निधीतून विकासकामे करण्यात आली काही प्रस्तावित आहे. ३) म.न.पा.त प्रथमच नगरसेवक निधी हा हेडचा अर्थसंकल्पात समावेश करून त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास विकास कामांसाठी २५ लाख निधी देण्यात आला. ४) म.न.पा.त प्रथमच वार्षिक जिल्हा नियोजन मंडळाचा मिळणारा निधी प्रत्येक वार्डनिहाय समान वाटप करण्याचे धोरण ठरविण्यात आले. ५) मनपाच्या न हरकत प्रमाणपत्रानुसार P. W.D. मार्फत जळगाव शहरात १०० कोटी व ८५ कोटींच्या रस्ताच्या कामांना पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात होईल. ६) शहरातील विविध भागांतील विविध कामांचे कार्यादेश दिलेले आहेत… पावसाळ्या नंतर ती प्रत्यक्षात सुरु होतील.

बंधु-भगिनींनो, गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडीत माझ्या पक्षनिष्ठेविषयी अनेक प्रकारचे वृत्त समाजमाध्यमातून आले. त्यावर मी खुलासा करू इच्छिते.. महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरदजी पवार साहेबांनी माझ्या निवासस्थानी भेट दिली. त्यावरून अनेकप्रकारच्या शंका उपस्थित केल्या गेल्या. यावर मी इतकेच सांगू इच्छीते की, आदरणीय पवार साहेब हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जळगावी दोन्यावर असतांना त्यांचा प्रवास हा आमच्या भागातून होणार होता, म्हणून त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते, त्यांनी ते स्विकारले याचा आम्हाला आनंद आहे. सहाजिकच कोणी मोठी व्यक्ती घरी येते तर आनंद हा होणारच. त्यात ते तर आमच्या आघाडीचे नेते आहेत.

अनेक जण मला विचारतात की आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार काय ? यावरही मी स्पष्टीकरण देवू इच्छिते की, आमच्या शिवसेना पक्षाची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक शिवसैनिक हा पदास लायक असतो. कारण त्यांचेवर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आमच्या पक्षात पक्षप्रमुख जो आदेश देतात, तो मान्य करण्याची पद्धत आहे. तेच सूत्र आगामी विधानसभा निवडणूकीसाठीही असणार. पक्षप्रमुख ज्यांना उमेदवारी देतील तो आमचा उमेदवार असेल. पक्षादेश आमच्यासाठी महत्वाचा असतो.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा हे पालिकेतील सर्वच पक्षांचे स्वप्न होते. ते माझ्या कार्यकाळात पूर्णत्वास आले याचा मला सार्थ अभिमान आहे. पुतळा उभारण्याचा निर्णय पालिकेचा आहे. त्याचे अनावरण केव्हा करावे? हा अधिकार पालिकातील सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार अनावरण समारंभ पार पडला. यासंदर्भात दुसरा आक्षेप घेतला जातो की, राजशिष्टाचारानुसार कार्यक्रम व्हायला हवा होता. तर शासकीय प्रोटोकॉलमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनीच करावे असा कोणताही नियम नाही. कोणाच्या हस्ते करावे ? हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे. ती संस्था स्वायत्त संस्था आहे. शिवाय सदरच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील तीनही मंत्री महोदयांना आमंत्रित करण्यात आले होते शहराचे आमदार व खासदार महोदय सुद्धा आमंत्रित होते. त्यामुळे राजशिष्टाचार पाळला गेला नाही हा आक्षेप चुकीचा आहे.

मित्रांनो, गेल्या अडीच वर्षात काम करतांना मी कधीही स्वार्थी विचार केला नाही. सर्व पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शेवटी प्रश्न आपल्या शहराच्या विकासाचा आहे. तिथे आपला परका असा भेदभाव मी कधीही बाळगला नाही नाही. बेरजेने प्रश्न सुटतात, वजाबाकीने केवळ नुकसान होते. शहराच्या विकासासाठी मी बेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. मायबाप जनतेने मला विश्वासाने शहरातील या सर्वोच्च पदावर बसविले होते. माझी जे. डी.सी.सी. बँक येथे संचालिका पदी निवड व आशिया खंडातील सर्वात मोठी ग. स. सोसायटी मध्ये तज्ञ संचालक म्हणून निवड झाली. जळगांव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माझे पती श्री. सुनिल महाजन यांचा ऐतिहासिक सर्वाधिक मताधिक्क्याने विजय झाला ही सर्व पदे मायबाप जनतेच्या आर्शिवाद, सहकार्याने आम्हास मिळालेले आहे. त्यांचे हे ऋण आपल्या कामातून फेडण्याचा प्रयत्न केला तरीही ते फिटणारे नाही.

या गत अडीच वर्षांच्या काळात मला उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांची खंबीर साथ लाभली. सर्व निर्णय आम्ही एकत्रित घेतले आहेत. आयुक्त व सर्व अधिकारी वर्गानेही चांगले सहकार्य केले. विशेष आभार मानायचे ते मनपातील कर्मचारी वर्गाचे. अतिशय आपुलकीची व आदराची वागणूक मला त्यांचेकडून मिळाली. समस्त कर्मचारी वर्गाचे मी आभार व्यक्त करते. सर्वांत महत्वाचे म्हणजे शहरातील सर्व सामाजिक संस्था, प्रसार माध्यमातील सर्व सहकाऱ्यांनी मला नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. तो सन्मान माझा नसून शहरातील समस्त जनतेचा सन्मान आहे. या अडीच वर्षात मी काय मिळवले तर सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान…! माझ्या महिला भगिनींनी मला मैत्रीण म्हणून दिलेली साथ…! जेष्ठांचे आशीर्वाद…! आणि युवकांनी दिलेली साथ…!

या अडीच वर्षाच्या कालावधीत बऱ्याच नवीन गोष्ठी मला शिकायला मिळाल्या.. नवीन अनुभव मिळाले. मी हि सर्व शिदोरी आयुष्यभर जपणार आहे. आणि मी केलेल्या कामांबाबत… निर्णयांबाबत मी समाधानी आहे. मिळालेल्या संधीचा उपयोग पुरेपूर शहरवासीयांकरीता करतांना कोणी जर चुकूनही माझ्याकडून दुखावले गेले असतील तर मी त्यांची जाहीर क्षमा मागते. माझा हेतू केवळ व केवळ पालिकेचे व जनतेचे हित पाहणे हेच होते.

संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘याच्यासाठी केला होता अट्टहास, ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ माझा हट्ट केवळ शहराच्या भल्यासाठीच होता. धन्यवाद!, अशा शब्दात मावळत्या महापौर जयश्री महाजन यांनी जळगावकरांचे आभार मानत आपले दालन सोडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button