जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे
जळगाव, :-मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लक्ष केंद्रित प्रयत्नांमुळे एका महिन्यात अशा गंभीर कुपोषित बालकांची संख्या १४२२ पर्यंत कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्ती कडे सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने कुपोषण मुक्तीसाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती देतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्याने मेडीकल , सर्जीकल अॅण्ड डायर्टी (एमएसडी) तीन प्रकारच्या संकल्पना वापरण्यात आल्या. यामध्ये मुलांना एनर्जी नेस्ट न्यूर्टीशन फूड, २२०० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली. पोषण पुनर्वसन केंद्रात बालकांच्या प्रवेशाचे प्रमाण वाढविले. हृदयात छेद असलेल्या मुलांच्या शोधासाठी मोहीम राबविली. त्यामुळे शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले. लसीकरण व औषध वाटपावर भर देण्यात आला.
सप्टेंबर २०२३ महिन्यात भारत सरकारच्या सूचनेनुसार पोषण माह मोहीम राबविण्यात आली. पोषण माहात जळगाव जिल्ह्यातील ३२ लाख लोकांपर्यंत आम्ही पोहचलो. यामध्ये जेवण कसे तयार करायचे, रानभाजीचा वापर कसा करायचा, उपलब्ध संसाधनांचा वापर कसा करायचा याबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी सांघिक मेहनत घेतली. जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः सहा तालुक्यात भेट दिली. याचा एकत्रित परिणाम म्हणून आज कुपोषीत बालकांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या ४१० ने कमी झाली आहे. तर मॅम (मध्यम कुपोषित) बालकांची संख्या सुमारे आठशेने कमी झाली आहे. म्हणजे एक हजारापेक्षा जास्त मुलांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. इतर मुलांच्या ही आरोग्यात सुधारणा झाली आहे मात्र ते अद्याप कुपोषणाच्या बाहेर निघालेले नाहीत. हे बालक ही लवकरच कुपोषण मुक्त होतील. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत जळगाव जिल्हा कुपोषण मुक्त निश्चित होणार असल्याची आशा जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.
०००००००००००००