
जळगाव मनपा निवडणूक: महायुतीचा विजयाचा चौकार; शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर भाजपचा एक उमेदवार बिनविरोध
प्रभाग ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपला वरचश्मा कायम राखला असून, गुरुवारी दिवसभरात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर महायुतीचे एकूण चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. प्रभाग ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने महायुतीच्या विजयाचा ‘चौकार’ पूर्ण झाला आहे.
निवडणुकीच्या या रणधुमाळीत गुरुवारी सकाळी प्रथम प्रभाग १८ ‘अ’ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर दुपारी प्रभाग ९ ‘अ’ मधून शिवसेनेचे मनोज चौधरी यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने तेही बिनविरोध निवडून आले.
विजयाची ही मालिका येथेच न थांबता, प्रभाग ९ ‘ब’ मध्येही शिवसेनेला यश मिळाले. या प्रभागातील अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, परिणामी शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली. तत्पूर्वी, बुधवारी प्रभाग १२ ‘ब’ मधून भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली होती.
एकापाठोपाठ एक अशा चार जागांवर बिनविरोध यश मिळवल्यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साह संचारला असून, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला आहे. विशेषतः शिवसेनेने (शिंदे गट) सलग तीन जागा खिशात घातल्याने राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा रंगली आहे.





