खान्देशजळगांवसामाजिक

नशिराबादमध्ये शहीद जवान शेख उस्मान बिस्मिल्ला पिंजारी यांचा ३६ वा शहीद दिन साजरा

सीआरपीएफ, पोलिस प्रशासन आणि नागरिकांची उपस्थिती; स्मारक उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

नशिराबादमध्ये शहीद जवान शेख उस्मान बिस्मिल्ला पिंजारी यांचा ३६ वा शहीद दिन साजरा

सीआरपीएफ, पोलिस प्रशासन आणि नागरिकांची उपस्थिती; स्मारक उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

नशिराबाद (प्रतिनिधी) : देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर जवान शहीद शेख उस्मान बिस्मिल्ला पिंजारी यांच्या ३६ व्या शहीद दिनानिमित्त रविवारी नशिराबाद येथे भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. सीआरपीएफतर्फे आयोजित या कार्यक्रमास नशिराबाद पोलीस स्टेशन व पोलीस विभागाचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी सीआरपीएफ पुणे येथून निरीक्षक व अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमास नगराध्यक्ष पिंटू शेट, नगरसेवक सैयद वासिफ अली उर्फ वासिफ सर, इकबाल शेख इब्राहिम, आसिफ अब्दुल गनी, नगरसेविका प्रतिनिधी रईस सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सीआरपीएफ निरीक्षकांनी आपल्या भाषणात शहीद शेख उस्मान पिंजारी यांच्या अदम्य शौर्य, देशभक्ती आणि बलिदानाची आठवण करून दिली. “अशा वीर जवानांमुळेच देश सुरक्षित आहे. येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळत राहील,” असे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष पिंटू शेट यांनी शहीद कुटुंबियांचा गौरव करताना, “नशिराबादला आपल्या या वीर सुपुत्राचा अभिमान आहे. त्यांच्या स्मारक उभारणीसाठी नगरपरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन दिले. नगरसेवक सैयद वासिफ अली उर्फ वासिफ सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना शहीद जवानांच्या जीवनप्रवास, संघर्ष, देशसेवा आणि शहादतीच्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान देशासाठी प्राणार्पण करताना त्यांनी दाखविलेल्या धैर्याचा उल्लेख करत त्यांनी शहीद कुटुंबियांच्या त्यागालाही उजाळा दिला. त्यांच्या भावनिक भाषणामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.

कार्यक्रमानंतर शहीद जवानांच्या स्मारक उभारणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. नगराध्यक्ष, सीआरपीएफ निरीक्षक, नगरसेवक वासिफ सर तसेच कर विभागाचे आझाद पटेल यांनी तारसोड रोड कॉर्नरवरील प्रस्तावित स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी संबंधित जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, लवकरच येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रम शांततापूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. वीरपत्नी फरीदा बी., शहीद जवानांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “नशिराबादच्या भूमीतून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानाचे स्मारक उभारले जाणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “शहीद जवान अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकत शहीद जवानांना अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button