खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

जळगाव मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनातील AC हटविण्याची मागणी

जळगाव मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनातील AC हटविण्याची मागणी

नियमबाह्य पद्धतीने AC बसविल्याचा आरोप; चौकशी करून खर्चाची जबाबदारी निश्चित करण्याची सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी वर्गाच्या दालनांमध्ये शासकीय नियमांची पूर्तता, सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया न करता एअर कंडिशनर (AC) बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे AC तात्काळ हटवून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता शैलेंद्र काशिनाथ सपकाळे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह

महानगरपालिकेचा कारभार सार्वजनिक निधीतून चालत असल्याने कोणताही खर्च करताना कायदेशीर मंजुरी, अंदाजपत्रकीय तरतूद, पारदर्शक खरेदी प्रक्रिया आणि आर्थिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, काही अधिकारी दालनांमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे सपकाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

मंजुरी नसेल तर AC हटवा

संबंधित AC बसविण्यासाठी शासनाची किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी, अंदाजपत्रकीय तरतूद, निविदा प्रक्रिया अथवा आवश्यक प्रशासकीय मान्यता उपलब्ध नसेल, तर ते AC तात्काळ हटविण्यात यावेत. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून झालेल्या खर्चाची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

खर्च, वीजबिलाचीही चौकशी करा

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून AC खरेदीसाठी देण्यात आलेल्या मंजुरी आदेशापासून खरेदी प्रक्रिया, झालेला खर्च, त्यानंतरचा वीज वापराचा खर्च आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

न्यायालयीन मार्गाचा इशारा

निवेदनावर तातडीने ठोस कार्यवाही न झाल्यास माहितीच्या अधिकारातून संबंधित माहिती मागविण्यासह सक्षम प्राधिकरणांकडे तक्रार करण्यात येईल. तसेच सार्वजनिक निधीच्या गैरवापराबाबत आवश्यक असल्यास उच्च न्यायालय अथवा सक्षम न्यायालयात कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही सपकाळे यांनी दिला आहे.

निवेदनासोबत मनपा कार्यालयातील संबंधित दालनांमध्ये बसविण्यात आलेल्या AC चे छायाचित्रे पुरावा म्हणून जोडण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button