मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी
जळगाव,;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला.
राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला घरोघरी जाऊन मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. याप्रसंगी मराठा – कुणबी शोध मोहीमेचे जिल्ह्याचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
सर्वेक्षणासाठी शासनाकडून प्राप्त प्रश्नावलीनुसार मराठा कुटुंबाशी संवाद साधत सर्वेक्षण करून घेण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करतांना कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे तसेच आस्थेवाईकपणे संवाद साधत कुटुंबाकडून त्यांच्या सामाजिक – आर्थिक परिस्थिती कशी जाणून घ्यायचे, यांचे प्रशिक्षण अधिकारी – कर्मचाऱ्यांना देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मराठा कुटुंबास भेट दिली.
मराठा कुटुंबासोबत संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांना या सर्वेक्षणासाठी एक तास दोन मिनिटे लागली. यामुळे प्रत्यक्ष एका कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी किती वेळ लागू शकतो. यांची माहिती झाली. याचा उपयोग अधिकारी – कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी होणार आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.