चोपडा : – चोपडामार्गे जळगावात मध्यप्रदेश मधून घेवून येणाऱ्या गुटख्याच्या आशयर ट्रॅकवर आयजींच्या पथकाने कारवाई केली. आयशरमधून सुमारे ५२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अकुलखेड गावाजवळ केली.
राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने गुटख्याची संपूर्ण राज्यभरात विक्री केली जाते. मध्यप्रदेश राज्यातून उमर्टी, सत्रासेनमार्गे अकुलखेडा कडून जळगावकडे (एमएच १९ सीवाय ६९७२) क्रमांकाच्या आयशरमधून सोमवारी सकाळच्या सुमारास गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक
यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचत चोपडा तालुक्यातील अकुलखेडाजवळील चावरा स्कुलजवळ गुटखा घेवून जाणारे वाहन अडविले. त्यांनीया वाहनाची तपासणी केली असता, त्यांना वाहनात प्रतिबंधित असलेला ५२ लाखांचा गुटखा मिळून आला.
कारवाई केल्यानंतर पोहेकॉ रविंद्र स्वरूपसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून कल्पेश अशोक साळुंखे (वय २६, रा. शिदीगाव भडगाव), ललित माधव जाधव (वय २६, रा. दादावाडी, जळगाव), अमोल युवराज पाटील, (वय २१, तुरट खेडा पारोळा) यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर वाहन आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने पकडलेला गुटखा हा जळगावातील अरुण पाटील या गुटखा माफियाकडे येणार होता. अशी माहिती मिळाली .