जळगाव : २२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (वय २६, रा. सुप्रिम कॉलनी) याला दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. तरी देखील तो हातात तलवार घेवून दहशत माजवित असतांना एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो हद्दपार असतांना सुप्रिम कॉलनीतील मच्छी बाजार परिसरात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल.
त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गरजे, मंदार पाटील यांचे पथक तयार करुन पिण्या यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याला न्यायमूर्ती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.