मुंबई ;- ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सीएम निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाहीर प्रवेश सोहळा रात्री 8 वाजता पार पडणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असतानाच पुन्हा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
आमदार रविंद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी (10 मार्च 2024) संध्याकाळी रविंद्र वायकर हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. रविंद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, आमदार रविंद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील. इतकेच नाही तर तपास यंत्रणांकडून सुरू असलेला चौकशीचा ससेमिरा पाहता रविंद्र वायकर हे लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडतील असेही बोलले जात होते. अखेर आता रविंद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.