इतर

१९ वर्षांनी मिळालेला न्याय : मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यातून मुस्लिम तरुणांची निर्दोष मुक्तता; जमीयत उलमा व मुफ्ती हारून नदवी यांचे आभारप्रदर्शन

१९ वर्षांनी मिळालेला न्याय : मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यातून मुस्लिम तरुणांची निर्दोष मुक्तता; जमीयत उलमा व मुफ्ती हारून नदवी यांचे आभारप्रदर्शन

जळगाव (प्रतिनिधी – आसिफ शेख)
मुंबई उच्च न्यायालयाने २१ जुलै २०२५ रोजी ऐतिहासिक निर्णय घेत २००६ मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या १२ मुस्लिम तरुणांना निर्दोष मुक्त केले. यामध्ये जळगाव येथील आसिफ बशीर खान याचाही समावेश असून, त्याला खालच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तब्बल १९ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर सत्य आणि संयमाच्या विजयाची नोंद झाली आहे.

या निर्णयामुळे पीडित कुटुंबीयांना केवळ दिलासा मिळाला नाही, तर देशातील न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला. या लढ्याचे श्रेय जमीयत उलमा-ए-हिंदचे वरिष्ठ नेते हजरत मौलाना अरशद मदनी व महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना हलीमुल्लाह कासमी यांच्या नेतृत्वाला जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जमीयतच्या वकिलांनी कोणताही भेदभाव न ठेवता निःपक्षपातीपणे आणि कायदेशीर तरतुदींनुसार लढा दिला.

या न्यायलयीन विजयाच्या पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने जळगावात एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी जमीयत उलमा महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांच्या हस्ते वकिल व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी जमीयतच्या या संघर्षाबद्दल मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास वक्फ मजलिस-ए-मुशावरतचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, जमाअते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष सुहैल अमीर, सुन्नी जमातचे सय्यद अयाज अली, काँग्रेसचे जमील शेख व आमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे एजाज मलिक, शिवसेनेचे खालिद बागबान, ईदगाह ट्रस्टचे अब्दुल अजीज सालार, नगरसेवक रियाज बागबान, हाफिज सफी, इरफान सालार, अब्दुल कय्यूम शाह, सै.साहिद आदी मान्यवर उपस्थित होते.

ही सभा केवळ कृतज्ञतेचे प्रतीक नव्हती, तर ती समाजाने एकजुटीने अन्यायाविरुद्ध लढा दिल्यास न्याय मिळतोच, याचे उदाहरण ठरली. हा निकाल केवळ निर्दोषांना दिलासा देणारा नसून भारतीय संविधान व न्यायव्यवस्था अजूनही सक्षम असल्याचेही अधोरेखित करणारा ठरला आहे.

“इन्साफ उशिरा मिळाला, पण अंधाराच्या शेवटी एक नवा उजेड घेऊन आला!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button