खान्देशजळगांवधार्मिकराजकीयशासकीयसामाजिक

ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

जळगाव,- जळगाव शहरातील मस्जिद-ए-नूर, काट्या फाईल येथे “ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जमाअत-ए-इस्लामी हिंद, जळगाव व सद्भावना मंच, जळगाव शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण मनुष्य जातीचा निर्माता हा एकच असून त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. आपल्या सर्वांचा जनक एकच असल्याने सर्वच एकमेकांचे भाऊबंध होतो. जातीभेद, धर्मभेद हा कुठेच नसून दोघांना जोडणे हेच सर्वात श्रेष्ठ कार्य असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ.सैय्यद रफीक पारनेरकर यांनी केले.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून इस्लामिक स्कॉलर डॉ.सैय्यद रफीक पारनेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित प्रमुख अतिथी म्हणून बुद्धकिर्ती महाथेरो, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल करीम सालार, प्रा.डॉ.साहेब वीरभद्रराव पडळवार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, विश्वनाथ जोशी, डॉ.मिलींद बागुल, फारूक शेख, एजाज मलीक, सोहेल अमीर शेख, माजी नगरसेवक शिवचरण ढंढोरे, प्रशांत नाईक, चेतन सनकत, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी, अब्दुल्लाह शेख, आरिफ देशमुख, मेहमूद खान आदी उपस्थित होते.

गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजात निर्माण होत असलेल्या चुकीच्या गैरसमजाला दूर करीत सर्व धर्मीय लोकांमध्ये सलोखा निर्माण करणे हा हेतू होता. ईद निमित्ताने सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन मस्जिदची माहिती घेणे, विविध धार्मिक, सामाजिक बाबी समजून घेणे व एकत्रित शिरखुर्माचा आस्वाद घेणे हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते.

फराळ, शिरखुर्माचा घेतला आस्वाद
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी सामूहिक संवादाद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मस्जिद परिचयनंतर सर्वांना शिरखुर्मा व फराळ देण्यात आला. कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा यांचे प्रतीक उभे केले.

सामाजिक समरसता जपण्याचा प्रयत्न
हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक आदर्श पायंडा ठरला असून, जळगाव शहरातील नागरिकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला. मस्जिद परिचय उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून ‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना’ यावर भर देत उपक्रमात सर्वांना सामाजिक सलोखा कसा जपला जातो याचे उदाहरण देत सर्वांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button