जळगांवराजकीयसामाजिक

इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी केला रास्ता रोको

इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी केला रास्ता रोको

जळगाव, प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी आकाशवाणी चौकात तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारच्या महागाईवाढीच्या धोरणांविरुद्ध कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जनतेवर लादलेल्या आर्थिक बोजाचा निषेध नोंदवला.

या आंदोलनाचे नेतृत्व युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी यांनी केले. कार्यकर्त्यांनी “कच्चं तेल स्वस्त, पण दरवाढ मस्त हेच का अच्छे दिन?”, “पेट्रोलवर नफा, जनतेवर फटका – सरकारची धोरणं भटका!” आणि “नफा कंपन्यांना, महागाई जनतेला हेच का सबका साथ?” अशा घोषणा देत सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६५.४१ डॉलर इतकी घसरली आहे, जी गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी पातळी आहे. तरीही केंद्र सरकारने इंधन दरात कोणतीही कपात केलेली नाही. रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार, तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १५ ते १६ रुपये आणि डिझेलवर ६.१२ रुपये नफा मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेवर महागाईचा बोजा पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, सुनील माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, डॉ. राहुल उदासी, रहीम तडवी, आकाश हिवाळे, चेतन पवार, साहिल पटेल, रफीक पटेल, योगेश साळी, संजय चव्हाण, मयूर पाटील, आबिद खान आणि अरबाज पटेल यांचा सक्रिय सहभाग होता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या असंवेदनशील धोरणांचा तीव्र निषेध करत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तात्काळ कमी करण्याची मागणी केली. आंदोलकांनी सरकारला इंधन दरवाढीच्या धोरणांचा पुनर्विचार करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button