खान्देशगुन्हेजळगांव

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

नगरसेवक अरविंद देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

जळगाव प्रतिनिधी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या पार्श्वभूमीवर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वीच तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली होती, तर महानगरपालिका प्रशासनाकडूनही सरकारी फिर्याद नोंदविण्यात आल्याने प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

सदर प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती मिळत आहे. जर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला, तर ते तपासात अडथळा निर्माण करू शकतात, पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

जळगावकरांच्या कष्टाच्या पैशांचा प्रश्न असल्यामुळे या प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपींना तात्काळ अटक करून तपास प्रभावीपणे पुढे नेण्यात यावा तसेच जनतेचे कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या वेळी स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, विजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रकरणात तपास यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण तयार असून जनहितासाठी हा लढा पुढेही सुरूच राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button