
महिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ विकृतावर गुन्हा दाखल करा ; भाजपने
पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
जळगाव | प्रतिनिधीसोशल मीडियावर भाजप महिला कार्यकर्त्यांविषयी अत्यंत अश्लील, अभद्र आणि मानहानीकारक टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज भाजप शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. संबधित व्यक्तीवर कडक कारवाई न झाल्यास भाजप महिला मोर्चातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ४ मे २०२६ रोजी देशातील ५ पैकी ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर जळगाव जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला होता.
या आनंदाेत्सवाची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर, ‘रोहिदास अडकमोल’ नावाच्या फेसबुक प्रोफाईलवरून अत्यंत खालच्या दर्जाच्या कमेंट्स करण्यात आल्या. या कमेंट्समध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी भाषा वापरण्यात आली आहे.
भाजपचे शिष्टमंडळ आक्रमक
या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अशा प्रकारची टिप्पणी हा केवळ पक्षाचा अपमान नसून संपूर्ण स्त्री जातीचा अपमान आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय दंड संहितेनुसार संबंधित विकृतावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक रमेश मतानी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय चौधरी, गिरीश वराडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस आता या प्रकरणाचा तपास सायबर सेलच्या माध्यमातून करत आहेत.




