इतर

निमखेडी शिवारात भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

निमखेडी शिवारात भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
शिंदे गटाच्या महिला प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती आणि दीर अपघातात ठार

जळगाव (प्रतिनिधी) – शहरालगतच्या निमखेडी शिवारात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास एका अज्ञात अवजड वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांची नावे ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे (दोघे रा. निमखेडी) अशी आहेत. दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत असून, दररोजप्रमाणे शिवाजीनगर येथील जुन्या घरी माल तयार करण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. कांताई नेत्रालयाजवळील रस्त्यावर त्यांच्यावर काळाने घाला घातला.

या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मृत ज्ञानेश्वर शिवसेना (शिंदे गट) महिला शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात घरातील दोन पुरुष सदस्य गमावल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते, नातेवाईक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रुग्णालयात उपस्थित होते.

दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button