

भुसावळात गावठी पिस्तूल व दोन जिवंत राऊंडसह २१ वर्षीय तरुण ताब्यात
टेक्निकल हायस्कूल परिसरात पोलिसांची कारवाई; ₹३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ, प्रतिनिधी :
भुसावळ शहर पोलिसांनी टेक्निकल हायस्कूल परिसरात कारवाई करत एका २१ वर्षीय तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत राऊंडसह ताब्यात घेतले. ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहर पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना गोपनीय माहिती मिळाली की, गण्या लोहार नावाचा इसम टेक्निकल हायस्कूल परिसरात गावठी कट्टा घेऊन उभा आहे.
माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत टेक्निकल हायस्कूल परिसरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्याने गणेश संतोप लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असे सांगितले.
अंगझडतीत पिस्तूल आणि जिवंत राऊंड
संशयास्पद हालचालींबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस कमरेला खोचलेले गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह आणि दोन जिवंत राऊंड आढळून आले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आणले. जप्त केलेल्या शस्त्राची किंमत ₹३० हजार, तर दोन जिवंत राऊंडची किंमत ₹२ हजार, असा एकूण ₹३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिस्तूल कोठून आणले? पोलिसांचा तपास सुरू
गणेश लोहार याने हे गावठी पिस्तूल कोठून आणले, त्याच्याकडे शस्त्र बाळगण्यामागील उद्देश काय होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, ग्रेपोसई इकबाल सैयद, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शेवरे, गजानन पाटील, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील (चालक) सहभागी होते.




