मेहरून तलावात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या १० तरुणांचा माजी उपमहापौर करीम सालार यांच्या हस्ते गौरव

मेहरून तलावात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या १० तरुणांचा माजी उपमहापौर करीम सालार यांच्या हस्ते गौरव
जळगाव (प्रतिनिधी) : दिनांक ७ जून २०२५, शनिवारी दुपारी जळगाव येथील मेहरून तलावात नदीम शेख या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तब्बल १७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर १० तरुणांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलं. या धाडसी कार्याबद्दल माजी उपमहापौर आणि इकरा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार यांनी या तरुणांचा सत्कार केला.
तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने नदीम शेख यांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मेहरून परिसरातील पिरजादे वाडा तसेच तांबापुरा परिसरातील स्थानिक तरुणांनी धाव घेतली आणि १७ तास चाललेल्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ही एक धाडसी आणि मोलाची कामगिरी ठरली.
या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते सर्व १० तरुणांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक तरुणाला रोख २००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या सत्कार सोहळ्यावेळी मुक्ती हरून नदवी, एजाज मलिक, माजी नगरसेवक इक्बाल पिरजादे, साबीर मुस्तफा, शहीद मेंबर, जमील शेख, इस्माईल खान (बिल्डिंग पेंटर असोसिएशन अध्यक्ष) तसेच अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणांनी दाखवलेले धाडस आणि समाजासाठी केलेले हे कार्य खरंच प्रेरणादायी असून अशा प्रसंगी नागरिकांनी एकत्र येऊन दाखवलेली एकजूट कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.