
खान्देश टाइम्स न्यूज l प्रतिनिधी l मुंबई येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील समाजसेवक रोशन मराठे यांना “डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मेमोरियल अवॉर्ड २०२५” प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध सिनेअभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
टॉपनॉच फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लक्ष्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोशन मराठे यांना हॉटेल ताज लँडस् एंड, वांद्रे येथे हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांना विशेष सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या समारंभात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे, विधान परिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोरे आणि टॉपनॉच फाउंडेशनचे संस्थापक विनय चौधरी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ज्या महान व्यक्तींनी देश आणि धर्मासाठी समर्पण केले, त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी समाजात मानवसेवा करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
यावर्षीचा पुरस्कार लक्ष्य फाऊंडेशनचे संस्थापक रोशन मराठे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला.
यावेळी, मान्यवर मंत्र्यांनी लक्ष्य फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. रोशन मराठे यांनी आपल्या भाषणात फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरे आणि दिव्यांगांना वाटप करण्यात येणाऱ्या साहाय्यक उपकरणांविषयी माहिती दिली. त्यांनी टॉपनॉच फाउंडेशन, सोनू सूद आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.





