खान्देशगुन्हेजळगांव

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ : थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तात ५१२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई; ५१ लाखांहून अधिक दंड वसूल

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ : थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तात ५१२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई; ५१ लाखांहून अधिक दंड वसूल

जळगाव जिल्हा पोलिसांची कारवाई 

जळगाव (प्रतिनिधी) : नववर्षाचे स्वागत सुरक्षित वातावरणात व्हावे, रस्ते अपघातांना आळा बसावा आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात अभूतपूर्व अशी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत अवघ्या ४८ तासांत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तब्बल ५१२ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करत ५१ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जळगाव जिल्हा पोलिसांच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी एकत्रित कारवाई ठरली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेही यांच्या मार्गदर्शनाखाली ३० व ३१ डिसेंबर रोजी जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी सर्व प्रमुख चौक, महामार्ग व संवेदनशील ठिकाणी कडक नाकाबंदी लावण्यात आली होती.

‘ब्रेथ अॅनालायझर’च्या माध्यमातून वाहनचालकांची तपासणी करत मद्यपी वाहनचालकांवर थेट कारवाई करण्यात आली.

दिनांकनिहाय कारवाईचा आढावा घेतला असता,
३० डिसेंबर रोजी १७१ ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणांसह ४०२ इतर मोटार वाहन कायद्याच्या केसेस दाखल करण्यात आल्या असून ३ लाख ३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल झाला.

तर ३१ डिसेंबर रोजी कारवाई अधिक तीव्र करत ३४१ मद्यपी वाहनचालकांसह १,१०९ इतर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या दिवशीच ८ लाख ३८ हजार ३८६ रुपयांचा दंड वसूल झाला. एकूण दोन दिवसांत ११ लाख ४२ हजार १८६ रुपयांची थेट दंड वसुली झाली असून, न्यायालयीन दंड धरून एकूण रक्कम ५१ लाखांहून अधिक झाली आहे.

या मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखेने सर्वाधिक ५७ ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाया केल्या. त्याखालोखाल भुसावळ वाहतूक शाखेने ४५, चोपडा शहर पोलीस ठाण्याने २८, तर चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने २४ कारवाया केल्या. वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकारी-अंमलदारांनी रात्रंदिवस सतर्कतेने कर्तव्य बजावत ही मोहीम यशस्वी केली.
या कठोर कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, नववर्षाच्या रात्री जिल्ह्यात गंभीर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. ‘झिरो टॉलरन्स’ धोरणामुळे नागरिकांमध्येही वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, मोटार वाहन कायदा तसेच नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून, न्यायालयाकडून किमान १० हजार रुपयांपर्यंत दंड व कठोर शिक्षा होऊ शकते. यापुढेही जिल्ह्यात अशाच प्रकारच्या कडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे सांगत, नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव पोलीस प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button