खान्देशजळगांवसामाजिक

इस्राईल–इराण तणावामुळे गॅस तुटवड्याची चर्चा

इस्राईल–इराण तणावामुळे गॅस तुटवड्याची चर्चा

जळगाव जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जळगाव (प्रतिनिधी) — इस्राईल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या चर्चांना उधाण आले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती वितरक कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत विविध संदेश प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) या गॅस वितरक कंपन्यांकडून जिल्ह्यातील गॅस साठा व ग्राहकांच्या तक्रारींबाबत माहिती मागविली.
त्यावर तिन्ही कंपन्यांनी जिल्ह्यातील ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सध्या गॅस तुटवड्याची कोणतीही परिस्थिती नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, शासनाच्या सूचनेनुसार एका ग्राहकाला नवीन गॅस सिलिंडर मिळण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर ठेवण्याची अट लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगानेच वितरण प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित कंपन्यांनी दिली आहे.
यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे गॅस सिलिंडर साठवून ठेवू नयेत तसेच गरजेनुसारच सिलिंडर बुकिंग करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे अनावश्यक ताण निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button