खान्देशजळगांवसामाजिक

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’च्या बैठकीत वक्त्यांचे मत

 

जळगाव, (प्रतिनिधी): गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ ही राष्ट्रीय बैठक जैन हिल्स येथे 8 मार्चपासून सुरु आहे. या बैठकीच्या तिसऱ्या दिवशी देश-विदेशातून आलेल्या शांतीदुतांनी हवामान बदल आणि अहिंसक अर्थव्यवस्था यासारख्या विषयांवर चर्चा केली. शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग, स्थानिक समुदायांची भूमिका आणि जागतिक स्तरावरील सहकार्य आवश्यक असल्याचे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले.

 

“वर्किंग इन कॉन्फ्लिक्ट रिजन” या सत्रात काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि नक्षलग्रस्त भागातील अनुभव मांडण्यात आले. “जमीन अधिकार, सामाजिक न्याय, शिक्षण आणि संवाद याद्वारेच शाश्वत शांतता प्रस्थापित होऊ शकते,” असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये मुलांसाठी खेळ, पुस्तके आणि वैद्यकीय मदत यासारख्या उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच, वाढते जागतिक सैन्यीकरण आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर चिंता व्यक्त करत व्यापक शांतता निर्मितीची गरज अधोरेखित करण्यात आली.

 

दुसऱ्या एका सत्रात वक्त्यांनी सांगितले की, शांततेसाठी अहिंसक अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे आवश्यक आहे. गांधीवादी अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या “इकोनॉमी ऑफ परमानन्स” (शाश्वत अर्थव्यवस्था) या संकल्पनेचा संदर्भ देत, निसर्ग, समाज आणि मानवी जीवन यांचा समतोल राखणारी अर्थव्यवस्था काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले.

 

मैसूर येथील युवा वक्ता सुप्रित यांनी आपले अनुभव सांगताना सांगितले की, बेंगळुरूहून मैसूरला परतल्यानंतर ते स्थानिक समुदायासोबत मिळून ‘नई तालीम’, सेंद्रिय शेती, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक उद्योजकता यांच्या माध्यमातून “ड्रीम व्हिलेज २०४७” च्या दिशेने कार्य करत आहेत. जळगावचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील म्हणाले की, हवामान बदलाकडे केवळ पर्यावरणीय समस्या म्हणून पाहता येणार नाही, तर ते सध्याच्या आर्थिक व्यवस्थेशी संबंधित संरचनात्मक हिंसेचे एक रूप आहे. जलसंकट, संसाधनांसाठी वाढती स्पर्धा आणि हवामान बदलामुळे होणारे विस्थापन या समस्या भविष्यात मोठ्या सामाजिक संघर्षाचे कारण ठरू शकतात, असा इशारा त्यांनी दिला. या परिषदेचा समारोप ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील सुबीर बॉस हॉलमध्ये होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button