
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी; कुख्यात चेन स्नॅचर ‘आतंक’ जेरबंद
भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील विविध जिल्ह्यांत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांत धुमाकूळ घालणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तो मागील काही दिवसांपासून फरार होता.
अनेक जिल्ह्यांत ‘मोस्ट वॉन्टेड’
तपासादरम्यान उघड झाले की, सादिक अली याने जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर व ग्रामीण भागासह वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तो पोलीसांच्या रेकॉर्डवर फरार होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकात हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांचा सहभाग होता.
या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





