खान्देशजळगांव

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम

पारा ४२.३ अंशांवर; आज ४४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

जळगाव : प्रतिनिधी — जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. गुरुवारी जिल्ह्यात कमाल तापमान ४२.३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.१ अंश नोंदविण्यात आले. दिवसभर निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवला. सकाळी आर्द्रता ५४ टक्के तर संध्याकाळी ३१ टक्के इतकी नोंदली गेली.

गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र दिसत आहे. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याने उष्णतेची झळ किती तीव्र आहे, याची प्रचिती येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दि. १६ एप्रिल रोजी तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर १७ व १८ एप्रिल रोजीही तापमान ४३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, हलके व सैल कपडे वापरणे तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे थांबलेली रब्बी पिकांची काढणी आता पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. ग्रामीण भागात चारा साठवणूक तसेच पूर्वहंगामी कपाशी लागवडीपूर्व मशागतीच्या कामांनाही गती मिळत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, १९ एप्रिलपासून वातावरणात काहीसा बदल होऊन ढगाळ वातावरण, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button