
सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे
अनुभूती ट्री फेस्टिव्हलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव | प्रतिनिधी
अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे १३ ते १८ जुलैदरम्यान ‘अनुभूती ट्री फेस्टिव्हल’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सीड बॉल (बीजगोळे) तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. माती, सेंद्रिय खत आणि स्थानिक वृक्षांच्या बियांचा वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड बॉल त्यांच्या मनात पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ करणारे ठरले.
जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि अंबिका जैन यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य मनोज परमार, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
जैन इरिगेशनच्या गार्डन विभागातील अजय काळे, गिरीष जगताप तसेच पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, मयूर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. देशी वृक्षांच्या बिया, माती आणि नैसर्गिक खताचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने बीजगोळे तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.
समारोप कार्यक्रमात अंबिका जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सीड बॉलचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून ‘ग्रीन अॅम्बेसेडर’ बनण्याचे आवाहन केले. अधिकाधिक झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि पर्यावरण संवर्धनाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संदेश त्यांनी दिला.
प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, सीड बॉल पावसाळ्यात डोंगराळ, दुर्गम व ओसाड भागात टाकल्यास त्यातून नैसर्गिकरीत्या रोपे उगवून हरित क्षेत्र वाढण्यास मदत होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बीजसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव प्रत्यक्ष कृतीतून झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हातात सीड बॉल घेऊन “झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरण वाचवू” अशी सामूहिक प्रतिज्ञा केली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.




