
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन
जळगाव, : युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या मेरा युवा भारत (MY Bharat), जळगाव यांच्या वतीने ‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विकसित भारताच्या निर्मितीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील जळगाव जिल्ह्यातील युवक-युवती तसेच जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. संगीत, नृत्य, नुक्कड नाटक (पथनाट्य), रील/शॉर्ट फिल्म, स्लॅम पोएट्री (काव्य सादरीकरण), चित्रकला, वादविवाद आणि घोषवाक्य लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत घेण्यात येतील. सर्व सादरीकरणे मौलिक, सकारात्मक आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारी असावीत.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांची निवड स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केली जाईल.
स्पर्धेसाठी इच्छुकांनी www.mybharat.gov.in या MY Bharat पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२६ आहे.
अधिक माहितीसाठी कमलेश सोनवणे (मो. ९९६०८४२३६९) किंवा अभिषेक चवरे, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जळगाव (मो. ८७७९६८६६६०) यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शाळा, युवक मंडळे, एनएसएस, एनसीसी तसेच पात्र युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्यसनमुक्त भारत आणि विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेला बळकटी द्यावी, असे आवाहन केले आहे.





