शासकीयराजकीय

सावदा पालिकेच्या जम्बो सभेत 33 पैकी बहुतेक विषयांना मंजुरी; गट क्र. 61 आरक्षण प्रकरणातील निर्णय रद्द

सावदा पालिकेच्या जम्बो सभेत 33 पैकी बहुतेक विषयांना मंजुरी; गट क्र. 61 आरक्षण प्रकरणातील निर्णय रद्द

सावदा | प्रतिनिधी l मुख्तार शेख l तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सावदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सभेतील एकूण 33 विषयांपैकी बहुतेक विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तर गट क्र. 61 मधील आरक्षण वगळण्यासंदर्भातील यापूर्वीचा प्रशासकीय निर्णय रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आला.

सभेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यात आली.

80 फुटी रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत

सभेत 80 फुटी रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजला. एका बाजूला अतिक्रमणधारकांनी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, तर दुसरीकडे प्लॉटधारकांनी अतिक्रमणामुळे ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने ते तातडीने हटविण्याची मागणी केली. यापूर्वी या प्रश्नावर आंदोलन व उपोषण झाल्याचा उल्लेख करत हा वाद समन्वय बैठकीद्वारे मार्गी लावण्याणेच पुर्ण होईल असं विरोधी गट नेते राजेश वानखेडे यांनी सांगितले त्या नंतर सभेत अशी चर्चा झाली की या दोघांना न्याय दिलं जातील

अनधिकृत बांधकामांच्या नियमाकुल प्रस्तावाला नकार

विनापरवानगी झालेल्या बांधकामांना नियमाकुल करण्याच्या प्रस्तावावर सभागृहात सखोल चर्चा झाली. विरोधी गट नेते राजेश वानखेडेयांनी व शाम अकोले यांनी प्रस्तावास विरोध दर्शवित, यामुळे अनधिकृत व्यावसायिक बांधकामांना कायदेशीर संरक्षण मिळेल,व नगरपालिका मध्ये कोणी घर किंवा व्यवसायीक बांधकाम परवानगी साठी येण्या ऐवजी पहिलं बांधकाम करून घेतील नंतर परवानगी मिळणे साठी पालीकेत येतील या कारणांमुळे नगरपालिकेचा काय प्रभाव राहिल अशी भूमिका मांडली.नंतर या विषयावर चर्चा होऊन संबंधित प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला.

स्वच्छता ठेका व बायोमेट्रिक प्रणालीवर प्रश्न

पालिकेतील स्वच्छता ठेका प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ठेका प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवणारी बायोमेट्रिक प्रणाली दीर्घकाळ बंद असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ती त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

गट क्र. 61 आरक्षण प्रकरणात सभेचा महत्त्वपूर्ण निर्णय

गट क्र. 61 मधील आरक्षण वगळण्याच्या प्रशासकीय निर्णयावर सभेत तीव्र चर्चा झाली. नगरसेवक राजेश वानखेडे यांनी हा निर्णय नियमबाह्य असल्याचा आरोप करत, काही प्रकरणांना अल्प कालावधीत मंजुरी देण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित केले. नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असताना काहींना तातडीने लाभ मिळाल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदविला. यानंतर सभागृहाने संबंधित प्रशासकीय निर्णय रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.

विकासकामांना मंजुरी

सभेत शहर विकासासाठी अनेक महत्त्वाच्या कामांना हिरवा कंदील देण्यात आला. बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच सौजन्य फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर नाराजी

सभेला बांधकाम विभागाचे अभियंता अनुपस्थित राहिल्याने विरोधी गट नेते राजेश वानखेडे यांनी व अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सभेस उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच पालिका कर्मचारी उपस्थित होते.

अंमलबजावणीकडे नागरिकांचे लक्ष

सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय आणि ठराव मंजूर झाले असले, तरी अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, प्रशासनाची कार्यपद्धती आणि विकासकामांची गती या मुद्द्यांवर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. मंजूर झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, याकडे आता सावदाकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button