
मेहरुण स्मशानभूमी विकासाचा प्रश्न ऐरणीवर; महिनाभरात काम न झाल्यास ‘तिरडी आंदोलन’चा इशारा
जळगाव : मेहरुण स्मशानभूमीच्या विकासासाठी करण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेला इशारा दिला आहे. येत्या एका महिन्यात स्मशानभूमी विकासाचे काम सुरू न झाल्यास मनपाच्या समोर ‘तिरडी आंदोलन’ छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांच्या वतीने अशोक सिताराम लाडवंजारी यांनी ६ मार्च २०२६ रोजी महापौरांना निवेदन देत मेहरुण स्मशानभूमीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीची अद्याप दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी शेड, कंपाऊंड, लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था करणे, महादेव मंदिराकडून येणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, स्मशानभूमीतून जाणारा वाहतूक मार्ग बंद करणे, नवीन ओटे उभारणे तसेच वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या वतीने मनपाच्या समोर तिरडी मोर्चा काढण्यात येणार असून तिरडीवर बसून उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.





