
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; MIDC पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करत तब्बल ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९९ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ५ लाख ७८ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क येथे फिर्यादी मोईज अब्बास बोहरा यांची रुबी पेंट्स कंपनी असून ते कंपनी परिसरातच वास्तव्यास आहेत. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दि. १५ एप्रिल रोजी पहाटे घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष तपास पथक गठीत केले. पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी मध्यप्रदेशातील चाचरोपा पाटी, सेंधवा आणि खरगोन परिसरात वेशांतर करून आरोपींवर पाळत ठेवली. मोठ्या शिताफीने सहा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निलेश उर्फ भुर्या माहेरिया डुडवे, ताराचंद पठाण सोलंकी, सायसिंग राकेश सोलंकी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे आणि ज्यारशीरालाल मगन अलावे यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि ५ लाख ७८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. MIDC पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.





