जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पद्मालय हॉल येथे पार पडलेल्या शिबिरात १०३ रक्तपिशव्यांचे संकलन
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दल व रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पद्मालय हॉल येथे पार पडलेल्या या शिबिरात एकूण १०३ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिरासाठी तब्बल १८ डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि कविता नेरकर यांनीही उपक्रमात सहभाग घेत रक्तदानाबाबत जनजागृती केली.
शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांकडून सर्व रक्तदाते, डॉक्टर व स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले.





