खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात महिला दक्षता समिती सक्रिय; शाळा, महाविद्यालय परिसरात दामिनी पथकांचे विशेष पेट्रोलिंग

जळगावात महिला दक्षता समिती सक्रिय; शाळा, महाविद्यालय परिसरात दामिनी पथकांचे विशेष पेट्रोलिंग

पोस्को, सायबर गुन्हे प्रतिबंधासाठी जनजागृती; जिल्हाभर एकसमान सादरीकरण करण्याचा निर्णय

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सन २०२२ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीची पहिली बैठक आज पोलीस अधीक्षक कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महिला सुरक्षा, पॉस्को गुन्हे, सायबर फसवणूक तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणाबाबत विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आगामी शैक्षणिक सत्र लक्षात घेऊन जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यशाळेत लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रतिबंध, जनजागृती आणि आवश्यक कारवाईबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तसेच जळगाव शहरातील तब्बल २५ ठिकाणी पॉस्को आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एकसमान माहिती पोहोचावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यासाठी एक परिपूर्ण पीपीटी तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला. ही सादरीकरण सामग्री सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये दाखवून विद्यार्थ्यांना कायदेशीर माहिती आणि सुरक्षाविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे.

दरम्यान, नव्याने स्थापन करण्यात आलेले दामिनी पथक शाळा व महाविद्यालय परिसरावर विशेष लक्ष ठेवणार असून त्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय, येत्या १८ तारखेला सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची विशेष कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद, महिला सुरक्षा आणि बालकांवरील गुन्हे प्रतिबंध याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी जळगाव पोलीस दलाने घेतलेले हे पाच महत्त्वपूर्ण निर्णय आगामी काळात प्रभावी ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button