
राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप !
प्रफुल्ल पटेलांसह दिग्गजांना डच्चू; अजित पवारांच्या मुलांकडे पक्षाची सूत्रे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नावच नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिग्गज नेत्यांची नावे गायब
नव्या कार्यकारिणीत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ तसेच पक्षाचे लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनाही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षातील जुनी फळी बाजूला सारल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पार्थ आणि जय पवारांना मोठी जबाबदारी
या नव्या यादीत अजित पवारांच्या दोन्ही मुलांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून जय पवार यांची राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षात अधिकृत एंट्री झाली आहे.
‘नवे नेतृत्व’ पुढे आणण्याचा प्रयत्न?
प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने अजित पवार पक्षात नवीन नेतृत्व तयार करत असल्याचे संकेत मानले जात आहेत.
नव्या चेहऱ्यांना संधी
राष्ट्रीय कार्यकारिणीत सुबोध मोहिते, सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, अभिषेक बोके, संजय प्रजापती, धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग आणि डॉ. रमण प्रीत सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या या यादीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बदलांची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे मानले जात असून, आगामी काळात पक्षात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





