खान्देशगुन्हेजळगांव

गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष; TWJ कंपनीविरोधात जळगावात गुन्हा

गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष; TWJ कंपनीविरोधात जळगावात गुन्हा

२७९ गुंतवणूकदारांची तब्बल २३.८१ कोटींची फसवणूक; जळगाव शाखेचा फ्रेंचायसी अटकेत

जळगाव : भरघोस मासिक परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ असोसिएट्स प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांसह जळगाव शाखेच्या फ्रेंचायसीवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात २७९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांची गुंतवणूक घेऊन परतावा न दिल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ६१(२) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या कलम २१ व २३ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत TWJ असोसिएट्स जळगाव शाखेचा फ्रेंचायसी म्हणून काम पाहणारा मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१, रा. शिव कॉलनी, जळगाव) हा गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारणे, करारनामे करून देणे आणि त्याबदल्यात मोठ्या प्रमाणात कमिशन घेणे या व्यवहारात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीस तपासानुसार, TWJ असोसिएट्स प्रा. लि. पुणेचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर व नेहा समीर नार्वेकर, तसेच TWJ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. चे संचालक संकेश रामकृष्ण घाग आणि इतर एजंट यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत संगनमताने गुंतवणूक योजना राबवली. शेअर मार्केट ट्रेडिंगचे प्रशिक्षण, सेमिनार आणि मोठ्या परताव्याचे आश्वासन देत नागरिकांची दिशाभूल करण्यात आली.

गुंतवणुकीच्या ११ महिन्यांच्या मुदतीनंतरही गुंतवणूकदारांना रक्कम किंवा परतावा न देता विश्वासघात व अपहार केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे कंपनीविरोधात यापूर्वीही यवतमाळ, रत्नागिरी, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांना यापूर्वी अटक केली असून सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सपोनि गणेश फड, पोहेकॉ रविंद्र परदेशी, पोलीस कर्मचारी विकास पहुरकर आदींचे पथक तपास करत आहे.

दरम्यान, TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखेत गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे सादर करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button