
शिवसेनेकडून नागरिकांसाठी थंडगार पाणपोई सुरू; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
कडक उन्हात नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेचा सामाजिक उपक्रम
जळगाव: वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना, जळगावकरांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येथील पांडे चौक भागातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या थंडगार पाणपोईचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. भरउन्हात बाजारपेठ व इतर कामांसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना उन्हाळ्यात शुद्ध व थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्यामभाऊ कोगटा, महानगर प्रमुख संतोषभाऊ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, महानगर समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, दीपक पाटील, विशाल निकम, दीपक माळी, शुभम गवळी, सचिन सोनार, राहुल सांगिले, चेतन परदेशी, क्रिश सनकत, विजय वाघ, शंतनू नारखेडे, यश कोल्हे, मानस तळले यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा जनहितार्थ उपक्रम यशस्वी रीतीने पूर्ण करण्यासाठी जितेंद्र गवळी मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले. शिवसेनेच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि कडक उन्हात सुरू केलेल्या या पाणपोईचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.





