खान्देशगुन्हेजळगांव

खूनाच्या गुन्ह्यातील ९ महिन्यांपासून फरार संशयित जेरबंद

खूनाच्या गुन्ह्यातील ९ महिन्यांपासून फरार संशयित जेरबंद

पुण्याहून जळगावात कुटुंबियांना भेटण्यासाठी येताच पोलिसांनी रचला सापळा; रात्रीच्या गस्तीवेळी कारवाई

जळगाव : रामेश्वर कॉलनीतील तरुण विशाल उर्फ विक्की रमेश मोची (वय २६) यांच्या खूनप्रकरणातील नऊ महिन्यांपासून फरार असलेला संशयित अखेर रामानंद नगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आमीन हैदर तडवी (वय २२, रा. हरिविठ्ठल नगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विशाल मोची हा मित्र आकाश व रोहित भालेराव यांच्यासोबत वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरण कार्यालयात तक्रार करण्यासाठी जात असताना त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. वाढदिवस साजरा करीत असलेल्या काही तरुणांनी जुन्या वादातून हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले होते. गंभीर जखमी झालेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना १७ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती.

या प्रकरणी भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ बंड्या सुखलाल ठाकूर यांच्यासह ६ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वी पाच संशयितांना अटक केली होती. मात्र आमीन तडवी हा गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

दरम्यान, तो पुणे येथून जळगावात कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. रात्रीच्या गस्तीवेळी पोहेकॉ सुशिल चौधरी यांनी सुधाकर अंभोरे व सागर देवरे यांच्या मदतीने सापळा रचत आमीन तडवी याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे खूनप्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button