खान्देशगुन्हेजळगांव

ब्रेकिंग : जळगावात दोन सट्टापेढ्यांवर लूट? बंदूक, चाकूचा धाक दाखवून रोकड लांबवल्याची चर्चा

 ब्रेकिंग : जळगावात दोन सट्टापेढ्यांवर लूट? बंदूक, चाकूचा धाक दाखवून रोकड लांबवल्याची चर्चा

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरात दोन दिवसांत दोन सट्टापेढ्यांवर बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार झाल्याची खळबळजनक चर्चा सुरू आहे. इच्छादेवी चौकाजवळ आणि अजिंठा चौफुलीजवळील सट्टापेढ्यांवर तीन अज्ञात तरुणांनी लूट केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दोन्ही घटनांची पोलिसांकडून अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पहिल्या घटनेत २५ ते ३० हजारांची रोकड लुटल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता तीन तरुण इच्छादेवी चौकाजवळील एका रोलेट गेम (चकरी) अड्ड्यावर गेले होते. तेथे गर्दी असल्याने ते काही वेळाने तेथून निघून गेले. त्यानंतर जवळील वाईन शॉपमधून मद्य घेतल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजता पुन्हा सट्टापेढीजवळ आले.

यावेळी तिघांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची माहिती आहे.

अजिंठा चौफुलीजवळ पुन्हा लूट?

बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता अजिंठा चौफुलीजवळील एका सट्टापेढीवरही अशाच प्रकारची घटना घडल्याची चर्चा आहे. त्याच तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्याचे सांगितले जात आहे.

चोरटे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आले होते. त्यापैकी दोघांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्याची माहिती समोर आली आहे.

अवैध धंद्यामुळे तक्रारदार पुढे येण्यास धजावत नसल्याची चर्चा

या घटनांबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्याप कोणताही तक्रारदार पोलिसांकडे आला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही पोलिसांनी संबंधित सट्टाचालकांकडून घटनेबाबत माहिती घेतल्याचेही समजते.

सट्टापेढ्या अवैध असल्याने संबंधितांकडून अधिकृत तक्रार दाखल केली जात नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन वर्षांपूर्वीही घडले होते अशाच प्रकारचे प्रकार

जळगाव शहरात सुमारे दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीच्या घटना घडल्याची चर्चा होती. मात्र, अवैध धंद्यांशी संबंधित असल्याने तक्रारदार पुढे येत नसल्याचे त्यावेळीही समोर आले होते. काही वर्षांपूर्वी रावेर ते यावलदरम्यानही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे सांगितले जाते. त्यातील एका प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत घडल्याचे सांगितले जाणारे हे दोन्ही प्रकार अद्याप पोलिसांनी अधिकृतरीत्या दुजोरा दिलेले नाहीत. त्यामुळे नेमकी घटना काय घडली, लुटीची रक्कम किती आणि त्यामागे कोण आहेत, याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्टता येणार आहे. या कथित घटनांमुळे शहरातील अवैध सट्टा व्यवसाय पुन्हा चर्चेत आला असून, पोलिस आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button